अहिल्यानगर, दि. 25 सप्टेंबर 2025 Ahilyanagar Rain Update भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात 26 आणि 28 सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार,
- जिल्ह्यात वीजांचा कडकडाट,
- जोरदार वारे,
- तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यामुळे काही ठिकाणी पाणी साचणे, नाल्यांमध्ये पाणी वाढणे, तसेच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांना सूचना
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खालील सूचना व खबरदारीचे उपाय दिले आहेत:
- धरणे आणि नद्यांलगत पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.
- धरणातील किंवा नदीच्या प्रवाहातील पाण्यात उतरू नये.
- धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे.
- नदी, ओढे, नाले, पुल व बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
- अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
- डोंगर पायथ्याशी राहणाऱ्यांनी दरडी कोसळण्याच्या धोक्याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
